मुंबई : अजित पवार यांनी बारामतीत घेतलेल्या सभेत, ही शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन करण्यात येईल, कधी शेवटची निवडणूक असेल काय माहित, असे वक्तव्य केले होते. त्याचा जितेंद्र आव्हाड तिखट समाचार घेतला. त्यांनी अजित पवार यांच्याजोरदार हल्ला चढवला. ज्या माणसांनी तुम्हाला राजकारणात आणलं, ज्यांनी तुम्हाला मांडीवर बसविले त्या शरद पवारांचे शेवटचे भाषण म्हणताय म्हणजे तुम्हाला पाषाण हृदयी ही म्हणता येणार नाही. पाषाणालाही पाझर फुटतो पण तुम्हाला माया, आपुलकी काहीच राहिले नाही तुम्ही भावना शून्य झाला आहात. शरद पवारांचे मरण ही तुमची इच्छा आहे. आणि त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसतेय, असा घणाघात त्यांनी अजित पवार यांच्यावर घातला.
तुम्ही तर हद्द सोडली
एखाद्या माणसाच्या मृत्यूची इच्छा करणे कितपत योग्य आहे. तुम्ही तर काकाच्या मृत्यूची वाट पाहताय. शरद पवार हे अजरामर असतील. त्यांचे योग्यदान पण अजरामर असेल. शरद पवार यांच्या मृत्यूची वाट पाहताय, तुम्ही आज हद्द ओलांडली अशी खरमरीत टीका जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केली. येणाऱ्या काळात जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल असे आव्हाड म्हणाले.
जनता शरद पवार यांना विसरणार नाही
सत्ता गेली तरी चालेल पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देणारच असे म्हणणारे शरद पवार, महिलांना आरक्षण देणारे शरद पवार, त्यांच्या घोषणा आणि पॉलिसी ऐका, लातूरला भूकंप झाला, दीड महिना तिथेच राहिले आणि घर उभारली हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, असे ते म्हणाले.
तुमच्यासोबत काम केल्याची लाज वाटते
शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. तुम्हाला राज्यातही कोणी ओळखत नाही. शरद पवारांचे मरण ही तुमची इच्छा आहे.आणि त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसतेय. तुम्ही त्यांचा किती द्वेष करता हे मी फार पूर्वी पासून बघितलंय, कोणत्याच मिटिंग मध्ये तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघत नव्हतात. जेव्हा शरद पवार साहेब बोलायचे तेव्हा तुम्ही बरं बरं असच झालं पाहिजे म्हणायचे आणि तुमची नजर असायची भलतीकडे, अशी टीका आव्हाडांनी केली. तुमच्यासोबत काम केल्याची लाज वाटते, अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली.