जरांगेंनी मनातली सल सांगितली; तेव्हा आम्हाला खूप मारलं तो डाग, इतकं निर्दयी सरकार…
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मराठा आरक्षणासह अन्य मुद्द्यांवर भाष्य केलं. अंतरवलीत झालेल्या लाठीचार्जवर मनोज जरांगे यांनी भाष्य केलं आहे. लाठीचार्ज हा टर्निंग पॉईंट नव्हता. कारण आमच्या आई बहिणीचं डोकं फोडून आम्हाला आरक्षण नको होतं. आमच्यावर गोळीबार केला याच काही कारण नव्हतं. आम्हाला असं आरक्षण नव्हतं पाहिजे. आमच्या आई-बहिणी बसली असताना आम्ही धिंगाणा कसं करणार होतो?, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तेव्हा खूप मारलं- जरांगे
अंतरवलीत लाठीचार्ज झाला. तेव्हा आम्हाला खूप मारलं. तो लाठीचार्ज हा एक डाग आहे. इतकं निर्दयी सरकार मी कधीच बघितलं नव्हतं. त्यावेळी 400 पोलीस आमच्यात घुसले. माईकच्या वायर तोडण्यात आल्या. सगळं अचानक सुरू झालं. ते व्हायला नको होतं, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
“सगळ्यांचे आभार”
आंदोलनावेळी सगळ्यांनी मदत केली सर्वांना धन्यवाद देतो. आमच्या समाजाच्या मागण्या खूप वर्ष प्रलंबित होत्या. आमचा लढा अंतिम टप्प्यात आहे. नातेवाईकांना प्रमाणपत्र वाटा ही आमची मागणी होती. जे लोक सगे सोयरे आहेत. त्यांना देखील प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी होती. सरकारने मुंबईच्या वेशीवर राजपत्र दिलं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मोठी सभा घेणार- जरांगे
आम्ही आरक्षण घेऊन आलो. शांततेत गेलो शांततेत आलो. आमच्या समाजाचा हा प्रचंड मोठा विजय आहे. आम्ही दिवाळी साजरी केली आता महादिवाळी साजरी करू… पाहिलं प्रमाणपत्र वाटलं की सगळ्यात मोठी सभा घेणार आहोत. माझ्या मराठा समाजाने मला स्वीकारलं. मला नेतृत्व करायचं नव्हतं. पण आंदोलन करायचं होतं आणि प्रामाणिक पणे करायचं होतं. मला दुकानदारी करायची नव्हती. मी एका शेतकऱ्यांचं पोरगं आहे. मला कुठलीही पार्श्वभूमी नाही, असं मनोज जरांगे म्हणालेत.
जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
कुणबी असणाऱ्याच्या 57 लाख नोंदी सापडल्या आहेत. नोंदी जुन्या आहेत पण नव्याने सापडल्या आहेत. माझी म्हातारा माणूस म्हणून त्यांना विनंती आहे. आम्हाला चॅलेंज देऊ नये. आम्हाला मंडल कमिशनचं वाटोळं करायचं नाही. सभा घेऊन राजकीय पोळी भाजत आहेत. त्यांनी स्वतः वरच्या 3 केस मागे घेतल्या ओबीसी बांधवांनी सांगावं की शांत राहा. याला समजवून सांगा आम्ही सगळ्याला विनंती करणार आहोत. तीन वेळा असंच केलं आहे. नाहीतर ओबीसी समाजच वाटोळं करेल हा…, असं म्हणत जरांगेंनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे.