महाराष्ट्र ग्रामीण

काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, अखेर बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा

महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्याबाबतच्या एका बातमीमुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये असलेले मुंबईतील बडे नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. मिलिंद देवरा हे काँग्रेस सोडून शिंदे गटात जातील, अशी कुणालाही कल्पना नव्हती. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मुंबईतील ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडली आहे. ते अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेनुसार अखेर बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आता १० फेब्रुवारी रोजी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार आहे.

काय म्हटले बाबा सिद्दीकी यांनी

बाबा सिद्दीक यांनी राजीनामा दिल्याची माहिती ट्विट करत दिली. त्यात त्यांनी म्हटले की, मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झालो. गेल्या 48 वर्षांचा काँग्रेस सोबतचा माझा महत्त्वाचा प्रवास राहिला आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला या प्रवासाबद्दल बोलायला खूप आवडले असते. पण म्हणतात ना काही गोष्टी न सांगितल्या बऱ्या. माझ्या या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.

 

कोण आहेत बाबा सिद्दीकी

मुंबई काँग्रेसमधील बाबा सिद्दीकी मोठे नेते आहेत. मुस्लिम चेहरा म्हणून ते राजकारणात प्रसिद्ध आहेत. तीन वेळा ते वांद्रा येथून आमदार राहिले आहेत. विद्यार्थी नेते म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर मुंबई महापालिकेत नगरसेवक बनले. त्यानंतर 1999, 2004 आणि 2009 मध्ये वांद्रे मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून बाबांचा पराभव झाला होता.

बाबा सिद्दीकी बिहारचे पण राजकारण महाराष्ट्रात

बाबा जियाउद्दीन सिद्दीकी मूळचे बिहारमधील आहेत. परंतु त्यांनी राजकीय कारकीर्द मुंबईत केली. त्यांची मुलगी अर्शिया सिद्दीकी डॉक्टर आहे तर पत्नी शहजीन गृहिणी आहे. बाबा सिद्दीक काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत एक मुस्लिम चेहरा हवा आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे हे काम पूर्ण होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button