मनोरंजन

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटातील बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेवरून उचलला पडदा

मुंबई : 3 फेब्रुवारी 2024 | कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अंगी असलेले अभिनेते रवी काळे यांनी मराठी, हिंदीसह, तामिळ, तेलगू चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रवी काळे यांनी आजवरच्या आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून ते सिद्ध केलंय. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटातही ते आता स्वराज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दमदार भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रवी काळे प्रथमच ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट येत्या 16 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

आजवर विविधांगी भूमिका साकारणारे रवी काळे आता ऐतिहासिक भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना रवी काळे सांगतात की, “कोणत्याही कलाकारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला मिळणं हे एक आव्हान असतं आणि कलाकारालाही ते आव्हान स्वीकारायला आवडतं. बहिर्जी नाईक यांची भूमिका करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. मला ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात तशी संधी मिळाली ही नक्कीच आनंदाची बाब आहे.”

मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचं आहे.

फक्त तरुण पिढीच नव्हे तर सर्व वयोगटातील प्रेक्षक वर्ग सध्या ऐतिहासिक सिनेमा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी सिनेमागृहाकडे वळले आहेत. त्याचं कारण म्हणजे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. ‘सुभेदार’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ आणि ‘फत्तेशिकस्त’ यांसारख्या भव्य ऐतिहासिक सिनेमांसाठी दिग्पाल लांजेकर ओळखले जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button